सिकलसेल : आजार समजून घ्यावा!

सिकलसेल हा रक्तातील लाल रक्तपेशींचा रोग आहे. प्रामुख्याने बालकांमध्ये व क्वचितप्रसंगी वयस्कांमध्येही हा रोग आढळतो. मध्य भारतात, काही विशेष जाती-जमातीत हा रोग प्रामुख्याने आढळतो. हा रोग आनुवंशिक परंपरेचा आहे. पुरातन काळात मलेरिया या रोगापासून बचाव करण्यासाठी मानवाच्या जनुकांमध्ये काही बदल झाले. आपल्या पेशींमध्ये गुणसूत्रांची (जनुक ज्यात स्थित असतात असे क्रोमोझोम्स) जोडी असते. एक आईकडून गुणसूत्र येते तर दुसरे पित्याकडून. एका गुणसूत्रातील जनुकात बदल झाल्यास मलेरियापासून बचाव होतो, परंतु असा बदल झालेला दुसराही गुणसूत्र असल्यास मात्र रोगच उत्पन्न होतो. एक गुणसूत्र बदलले की त्याला ‘ट्रेट’ किंवा ‘कॅरिअर’ म्हणतात.

मध्य भारतातील काही विशिष्ट जातींमध्ये व जमातींमध्ये या ‘ट्रेट’चे प्रमाण ३०-४० टक्क्यांपर्यंत आहे. ‘ट्रेट’ असणाऱ्या पुरुष व महिलांमधील संयोगातून दोन ‘ट्रेट’ एकत्र येतात व संततीत रोग उत्पन्न होतो. अर्थात, असे प्रत्येक वेळेस न घडता प्रत्येक गर्भधारणेत अशी शक्यता २५ टक्के असते. जगातील इतरही देशांमध्ये हा रोग आढळतो. आफ्रिका खंड, युरोपमधील भूमध्य सागराच्या अवतीभोवतीचे देश आणि अमेरिकेतील स्थलांतरित अफ्रिकन लोक व मूळचे रेड इंडियन्स व हिस्पॅनिक्समध्ये हा रोग दिसून येतो. भारतातील सिकलसेलचा रोग जगाच्या इतर भागातील रोगापेक्षा कमी तीव्रतेचा असतो.

लक्षणे

  • रक्ताल्पता
  • अंगात बारीक ताप असणे
  • लवकर थकवा येणे
  • कधी कधी सांधे दुखणे
  • फार काम सहन न होणे
  • शरीरावर हलकीशी सूज
  • हलक्‍याशा कामाने श्‍वासोच्छ्वास वाढणे
  • “प्लिहा’वर सूज असणे
  • डोळे पिवळसर दिसणे, बाहेर आल्यासारखे वाटणे
  • कावीळ होणे

उपचार

या आजारावर कोणताही विशिष्ट उपचार नाही, परंतु आजाराच्या लक्षणानुसार डॉक्टर उपचार करतात. रुग्णाला जंतुसंसर्ग होऊ  नये म्हणून वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून प्रतिजैविके रोज एकदा किंवा दोनदा गरजेनुसार देतात. यात फॉलिक अ‍ॅसिड आणि खनिजयुक्त जीवनसत्त्वांच्या गोळ्यांचा समावेश असतो. सिकलसेलग्रस्त बालकांना डॉक्टरांनी आखून दिलेल्या पूर्ण लसी द्याव्यात. हल्लीच्या संशोधनानुसार अस्थिमज्जारोपण म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्रांटद्वारे हा आजार बऱ्याच अंशी घालवता येतो.

तामगाडगे ट्रस्ट मार्फत सिकलसेल रोगांसाठी करण्यात येणारे कार्य.

१) नियमित आरोग्य तपासणी करणे.
२) रोग्यांना निशुल्क किंवा निम्म्या दरात औषधे उपलब्ध करून देणे.
३) ग्रामीण भागात तसेच स्लम एरिया मध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करणे.
५) रोग्यांना रक्ताची गरज भासल्यास ते मिळवून देण्यास मदत करणे.
६) सिकलसेल रोगाची चाचणी निशुल्क करणे.
७) वेळोवेळी रोगांचे कौन्सिलिंग करणे.
८) रोग्यांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे. इत्यादी कार्य आमच्या ट्रस्ट मार्फत केले जातात.
९) सिकल सेल रुग्णासाठी ब्लड डोनेशन शिबिर घेणे.

मोकळ्या मनाने आम्हाला संपर्क करा

पेशंट ची माहिती

तुमची संपूर्ण माहिती गोपनीय ठेवली जाईल.